शहापूर, दि. १६ (प्रतिनिधी) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने `सेवा, सुशासन, गरीब कल्याण के ११ साल’ या उपक्रमांतर्गत शहापूर पिताश्री लॉन्स येथे संकल्प सभा घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय जनतेला आत्मविश्वास मिळाला. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याबरोबरच अनेक क्षेत्रात भारताच्या उज्ज्वल कामगिरीचा आलेख उंचावला आहे, यापुढे होणाऱ्या निवडणुकामंध्ये जिल्हापरिषद, पंचायत समितीमध्ये भाजपचेच उमेदवार निवडून येणार असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे केले.नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले पांडुरंग बरोरा यांनी आपल्या भाषणात म्हटले की कपिल पाटील हे खासदार नसले तरीही त्यांना मी खासदारच म्हणेन कारण कुठलेही लोकहिताचे विधायक काम आत्ताही त्यांच्याकडे नेले की ते होत असते.
त्यानंतर भाजपाच्या शहापूर ग्रामीण पूर्व मंडल अध्यक्ष सुभाष हरड व दक्षिण मंडल अध्यक्ष दीपक बोंबे यांचा पदग्रहण सोहळा पार पडला.
या वेळी भाजपाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, सतीश सापळे, नंदुशेठ डोहळे, महेश पतंगराव व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहापूर विधानसभेतील उमेदवार अविनाश शिंगे यांच्यासह राहुल विशे, सविता तारमळे, योगेश भोईर, हरिश्चन्द्र पाटील, शिरवंजे गावचे माजी सरपंच यशवंत फर्डे, बाळू सपाट, दत्तात्रय पवार व कसारा भागातील काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील व पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते भाजप मध्ये प्रवेश केला यावेळी समस्त कार्यकर्त्यांचे कपिल पाटील यांनी स्वागत केले.
भारताच्या इतिहासात मोदी सरकारने ११ वर्षांत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले. शेतकरी, महिला, युवा, दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजासाठी विविध योजना साकारल्या. या योजनांच्या माध्यमातून विविध समाजघटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. तर कोरोना काळापासून देशातील ८० कोटी नागरिकांना मोफत अन्न दिले. देशातील कोणीही उपाशी राहू नये, यासाठी मोदी सरकारने आजतागत ही योजना लागू ठेवली आहे, असे प्रतिपादन कपिल पाटील यांनी केले.
शेतकरी कल्याण, महिला सक्षमीकरण डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा, संरक्षण क्षेत्र आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारने उल्लेखनीय कामगीरी केली, याचा उल्लेख कपिल पाटील यांनी केला.
गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने मोफत अन्नाबरोबरच मोफत घरे, स्वच्छतागृहे, घरोघरी नळाने पाणी, मोफत गॅस आदी योजना राबवून सामान्यांना साथ दिली. त्यामुळे २५ कोटींहून अधिक नागरिक दारिद्र्यरेषेतून बाहेर पडले, अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली.
दरम्यान, शहापूर तालुक्यातील सर्वच स्तरातून भाजपाला पाठिंबा मिळत असून, आगामी निवडणुकीत भाजपाला जनतेची साथ मिळेल, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.