
( प्रतिनिधी): ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु झालेल्या आणि अल्पावधीतच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यात पोहोचलेल्या दै.अग्रलेखचा चौथा वर्धापनदिन रविवारी (दि.१५) कल्याणमधील के.सी.गांधी ऑडिटोरियममध्ये मोठ्या जल्लोषात साजरा झाला. विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या मान्यवरांना दै.अग्रलेख सन्मान २०२५ हा मानाचा पुरस्कार देवून व पत्रकार, नाट्यकलावंतांना सन्मानित करुन दैनिक अग्रलेखने चौथ्या वर्धापनदिनी अनोखा पायंडा पाडला.
मुंबईत नामांकित पत्रकारांच्या मुशीत तयार झालेल्या उमेश मारुती भेरे यांनी चार वर्षांपूर्वी शहापूरमध्ये दै. अग्रलेख हे दैनिक वृत्तपत्र सुरु केले.अभ्यासपूर्ण व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दखलपात्र बातम्या, अग्रलेख, विविध विषयांचा वेध घेणारी सदरे, वात्रटिका यांमुळे अल्पावधीतच लोकप्रिय बनलेल्या दैनिक अग्रलेखने ४ वर्षांचा यशस्वी पल्ला गाठला. या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत रविवारी (दि.१५) कल्याणमधील के. सी. गांधी ऑडिटोरियम येथे भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात रुग्णसेवक अजित जाधव, मुंबई म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बॅंकेचे संचालक भानुदास भोईर, अभिनेते सुभाष शिंदे, पत्रकार सुबोध रणशेवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धानके, समाजसेविका डॉ. पद्मिनी कृष्णा, साहित्यिक संतोष जाधव, लेखक, अभिनेता दिपक खांडेकर यांना मान्यवरांच्या हस्ते ‘दै.अग्रलेख सन्मान २०२५ ‘ हा मानाचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. दैनिक अग्रलेखच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.ग्रामीण कला मंच या नाट्यक्षेत्रातील नामवंत संस्थेच्या व्यासपीठावर विविध नाटके सादर करणाऱ्या कलावंतांना सन्मानपत्र देवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा स्तुत्य उपक्रम याप्रसंगी संपादक उमेश भेरे यांनी राबवला. दैनिक अग्रलेखने शहापूरमधील सामाजिक प्रश्नांवर लोकजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या खुल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक प्रदान सोहळाही यावेळी संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी संपादक उमेश भेरे यांच्या व दै. अग्रलेखच्या यशस्वी वाटचालीबद्दल अभिनंदन करत भेरे यांच्या अग्रलेखांचे व वात्रटिकांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी उत्तर भारतीय एज्युकेशन ऍन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. विजय पंडित, निर्माता-दिग्दर्शक राकेश राऊत, ह. भ. प. कैलास महाराज निचिते, कोकण कुणबी महोत्सव समितीचे अध्यक्ष रविंद्र चंदे, शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनायक सापळे, क्रूगर व्हेंटीलेशनचे जनरल मॅनेजर संपत शेंडगे, उद्योजक अशोक सांगळे, पालघर जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती संदेश ढोणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे प्रास्ताविक संपादक उमेश भेरे यांनी तर सूत्रसंचालन नितीन गाडेकर व संतोष दवणे यांनी केले.