(शहापूर ): पारंपारिक शेती ऐवजी आधुनिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब केल्यास शेती हा खरोखरच फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, हे शहापूर तालुक्यातील परटोली गावचे नवतरुण शेतकरी आणि पोलीस पाटील राजेश रामचंद्र ढमके यांनी सिद्ध करून दाखवले आहे. केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता, कल्पकतेने केलेल्या शेतीमुळे त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवत शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. त्यात त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित चार एकर जागेत ३०० आंबा झाडांची बाग अत्यंत नेटकेपणाने फुलवली आहे. मात्र आंब्याचे उत्पादन मिळेपर्यंत थांबून न राहता, त्यांनी ‘आंतरपीक’ पद्धतीचा प्रभावी वापर केला. बागेत रिकाम्या राहिलेल्या जागेत त्यांनी काकडी, कलिंगड, घेवडा आणि वांगी यांसारखी पिके घेतली. यामुळे कमी खर्चात आणि उपलब्ध साधनसामग्रीत त्यांना वर्षभर उत्पन्न मिळण्यास मदत झाली.
चालू वर्ष २०२५-२६ मध्ये राजेश यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करत सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला. रासायनिक खतांचा वापर टाळून पिकवलेल्या कलिंगडाचे त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले. व्यापारी दृष्टीकोन ठेवून केलेल्या या शेतीमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य तर मिळालेच, पण मातीचा पोत सुधारण्यासही मदत झाली.
राजेश ढमके यांच्या या यशस्वी प्रवासात कृषी विभागाचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव , उपकृषी अधिकारी अशोक पवार व सहाय्यक कृषी अधिकारी माहेश्वरी भोसले यांनी वेळोवेळी त्यांच्या शेताला भेटी देऊन तांत्रिक मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या सल्ल्यामुळेच शेतीतील जोखीम कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत झाली, अशी कृतज्ञता ढमके यांनी व्यक्त केली आहे.
आजच्या तरुण पिढीने नोकरीच्या मागे न धावता, जर पोलीस पाटील राजेश ढमके यांच्याप्रमाणे जिद्द, चिकाटी आणि शास्त्रशुद्ध नियोजनाची जोड दिली, तर शेतीतून नक्कीच लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवता येते. परटोली गावच्या या ‘आदर्श पोलीस पाटील व शेतकऱ्याचा’ हा प्रवास महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.