(शहापूर ):22जुलै :खरपत येथील खुनाचा गुन्हा तीन दिवसानंतर उघड झाला आहे.स्थानिक गुन्हे शाखा व किन्हवली पोलिसांचे तपास कौशल्य,तांत्रिक विश्लेषणाने व गोपनीय माहितीच्या आधारे संयुक्त तपासाला मोठे यश आले आहे.
शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ जुलै २०२६ रोजी खरपत येथील वामन आलो निरगुडा (वय ५२) यांचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याप्रकरणी मृताची पत्नी ज्योती वामन निरगुडा यांनी किन्हवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या नेतृत्वाखाली तपासाला वेग देण्यात आला.
तपासादरम्यान घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण, कसून तपास आणि गोपनीय तेच्या आधारे संशयितांची चौकशी करण्यात आली. या तपासातून मृताच्या पत्नीचे आरोपी धनेश देऊ मेंगाळ (वय ३५, रा. खरपत ता. शहापूर) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. त्या संबंधातून अडथळा ठरत असल्याने आरोपीने धारदार शस्त्राने वामन निरगुडा यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व किन्हवली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करत अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.