मुंबई प्रतिनिधी : अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने “कुर्मी जोडो अभियान” (6 जून 2026 ते 15 ऑगस्ट 2027) राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय इतिहासातील दोन महत्त्वपूर्ण घटनांच्या स्मरणार्थ हे अभियान आयोजित करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन (6 जून 1674) आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी उपपंतप्रधान पदाची घेतलेली शपथ (15 ऑगस्ट 1947) या दोन ऐतिहासिक घटनांमधून समाज एकता, स्वाभिमान आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश मिळतो. याच प्रेरणेने हे अभियान सुरू करण्यात येत आहे.
अभियानाचा शुभारंभ 6 जून 2026 रोजी रायगड किल्ल्यावर होणार असून सांगता समारंभ 15 ऑगस्ट 2027 रोजी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे होणार आहे. सुमारे 14 महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट कुर्मी समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, समाजात एकता व बंधुभाव वाढवणे, विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या समाजघटकांमध्ये एकात्मतेची जाणीव निर्माण करणे तसेच समाजातील महापुरुषांचे विचार पुढे नेणे आणि युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे हे आहे.
“कुर्मी” या प्रातिनिधिक संज्ञेत मराठा, रोड मराठा,कुणबी,कुडुंबर, कलबी, कुडुमी, वेलमा, गुर्जर, पटेल, पाटीदार, रेड्डी, कापा. कम्मा, कुलमी, नायक,नायडू,कापूनाडू, खंडायत, ओक्का लिंगा,देवेंद्र कुल वेल्लालार,कंबोज, अंजना समाज आदी विविध समाजघटकांचा समावेश मानला जातो. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा हा समाज मुळात एकच असल्याची जाणीव दृढ करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.
अभियानांतर्गत समाज एकता रॅली, मेळावे, गाव व पार बैठका, युवक व महिला सक्षमीकरण कार्यक्रम, शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे, नाटिका व पथनाट्य, सामाजिक संवाद उपक्रम तसेच डिजिटल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा सन्मान सोहळा आयोजित केला जाणार आहे.
हे अभियान केवळ एक कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणण्याचा, त्याची ओळख मजबूत करण्याचा आणि भविष्याची दिशा ठरवण्याचा व्यापक प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय पाटील, प्रदेश महासचिव जयेश शेलार पाटील आणि प्रदेश कोषाध्यक्ष संदीप काळे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.आहे