(कल्याण प्रतिनिधी ):2 मे कल्याण तालुक्यातील मुरबाड नगर महामार्गावर बापसई फाट्याजवळ काल रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. पेट्रोल पंप परिसरात वेगाने येणाऱ्या वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे,या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा बिबट्या रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव येणाऱ्या वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की बिबट्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर काही वेळातच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली, दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून संतापाची लाट उसळली आहे.
या परिसरात यापूर्वीही बिबट्यांचा वावर आढळला असून जंगलालगत असलेल्या महामार्गावर अशा घटना वारंवार घडत असल्याने स्थानिकांनी सांगितले मात्र वेग मर्यादा, चेतावणी फलक आणि वन्यजीव संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप ही करण्यात येत आहे
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनखाते आणि स्थानिक पोलीस स्टेशनची टीम तात्काळ घटनास्थळी रवाना झाली, मृत बिबट्याचा पंचनामा आणि पुढील तपास सुरू असल्याची माहिती कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे या घटनेमुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील वाढता संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.