शहापूर 9जून : पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे, शहापूरच्या जलसंधारण विभागात उपअभियंता पदी कार्यरत असलेले लक्ष्मण श्रीरंग मंडले यांची पत्नीनेच प्रियकराला सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
6 जून रोजी सातारा जिल्ह्याच्या कराड शहरात एक हत्येची थरारक घटना घडली होती. ठाण्याच्या शहापूर येथे जलसंधारण विभागात कार्यरत असलेले उप अभियंता लक्ष्मण मंडले यांची कारने चिरडून हत्या केली होती. सुरुवातीला हा अपघात असावा, असं सर्वांना वाटलं. मात्र संशय आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची खोलात जाऊन तपासणी केली, सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तपासाअंती हा अपघात नसून घातपात असल्याचं निष्पन्न झालं. शिवाय ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर पत्नीनेच घडवून आणल्याचं उघडकीस आले.
आरोपी पत्नी सुरेखा मंडले हिने आपला भाऊ आणि प्रियकराच्या मदतीनेच पतीचा काटा काढल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सुरेखा हिचे वयाने ११ वर्षे लहान असणाऱ्या एका तरुणावर जीव जडला होता. दोघांमध्ये मागील तीन वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू होते.त्यामुळे तिला पती लक्ष्मण मंडले यांच्याकडून त्रास होत होता. त्यामुळे सुरेखाने आपल्या प्रियकराला तीन लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पत्नी सुरेखा मंडले, तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना घटनेच्या दिवशीच अटक केली होती. यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा कराड पोलिसांनी मंडले यांच्या हत्येत प्रत्यक्ष सामील असलेला सुरेखाचा प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश होनसुरे यांना बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांची कसून चौकशी सुरू आहे.
हत्येचा नेमका कट कसा रचला.
मृत अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ५४) हे जलसंधारण विभागात कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती ठाणे जिल्ह्याच्या शहापूर येथे होती. ५ जूनच्या रात्री लक्ष्मण मंडले हे ठाण्याहून कराडकडे येत होते. त्यांनी याबाबतची माहिती आपल्या पत्नीला फोनवरून दिली होती. तसेच पहाटे आपल्याला न्यायला ये, असंही त्यांनी पत्नीला सांगितलं होतं. मात्र हीच माहिती त्यांच्यावर उलटेल, याची त्यांना जराही कल्पना नव्हती. ६ जून रोजी पहाटेच्या सुमारास जेव्हा ते कराडमधील कोल्हापूर नाका परिसरात गाडीतून उतरून पायी घरी निघाले होते, त्याच वेळी आरोपींनी त्यांना पाठिमागून कारने जोराची धडक दिली. आरोपींनी तीन वेळा कार मागेपुढे करून त्यांना चिरडून ठार मारलं आणि तिथून फरार झाले.
पतीचा काटा काढण्यासाठी ३ लाखांची सुपारी..
तपासादरम्यान समोर आलेली माहिती जाणून पोलिसांनाही धक्का बसला. मृत लक्ष्मण मंडले यांची पत्नी सुरेखा मंडले आणि तिचा प्रियकर प्रथमेश थोरात यांचे २०२३ पासून प्रेमसंबंध होते. कापड दुकानात काम करत असताना त्यांची ओळख झाली होती. पतीकडून मिळणाऱ्या त्रासाला कंटाळून आणि प्रियकरासोबत राहण्यासाठी सुरेखाने पतीचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी तिने प्रियकर प्रथमेशला तब्बल ३ लाख रुपये दिले होते. लाईव्ह लोकेशनची माहिती घेऊन काटा काढला..
हत्या करण्यासाठी प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश होनसुरे यांनी कराडमधून एक कार भाड्याने घेतली होती. ६ जूनच्या पहाटेपासूनच पत्नी सुरेखा सातत्याने पती लक्ष्मण यांच्याशी फोनवर संपर्क ठेवून होत्या. पती सध्या कुठे पोहोचले आहेत, याची खडान् खडा माहिती, लाईव्ह लोकेशन ती सातत्याने आपल्या प्रियकराला पुरवत होती. याच माहितीच्या आधारे आरोपींनी लक्ष्मण मंडले यांचा पाठलाग केला आणि कोल्हापूर नाका येथे संधी साधून त्यांना कारने चिरडलं.
आरोपींना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी..
यापूर्वी पोलिसांनी संशयावरून मृत पतीची पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले आणि तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण यांना ताब्यात घेतले होतं. त्यांच्या चौकशीतून मिळालेली माहिती, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मूळ मारेकऱ्यांचा माग काढला. पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली असून कोर्टाने त्यांना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.