दि, 6 डिसेंबर 2025
ठाणे : महामानव डॉ बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्व संध्येला खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. विशेष म्हणजे 6 डिसेंबर हा दिवस देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करून डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला जात असतानाच, त्यांच्याच पदस्पर्शानं पावन झालेल्या या विहिरीवर पाणी सत्याग्रह झाला होता. मात्र आता ती ऐतिहासिक पाणी सत्याग्रहाची साक्ष देणारी 100 वर्षे जुनी ‘सतीची विहीर’ बुजवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ही सतीची विहीर भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायत हदद्दीत असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या घटनेवर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
100 वर्ष जुनी सतीची विहीर बुजवली : भिवंडी तालुक्यामधील पडघा ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नं. 79/10 मधील सतीची विहीर जवळपास 100 वर्ष जुनी असून त्याच सतीच्या विहिरीवरती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी सत्याग्रह केला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर पडघा, समतानगर इथं काशिनाथ हाशाबा दोंदे यांच्या घरी त्यावेळी आले होते. याच काळात सतीची विहीर निवडून इथं सत्याग्रहींसह पाणी काढण्यात आलं होतं. या घटनेचा उल्लेख ‘ठाणे संघसरिता’ या पुस्तकात स्पष्टपणे करण्यात आला आहे. “आम्ही लहान होतो, तेव्हा डॉ. बाबासाहेब पडघ्यात आले होते. सतीच्या विहिरीवर त्यांनी पाणी सत्याग्रह केला. एका शिसवीच्या झाडाखाली त्यांची मोठी सभा झाली होती. ‘मुलांना शिक्षण द्या’ असा संदेश त्यांनी आम्हाला दिला होता. समतानगरमधील काशिनाथ दोंदे यांच्या घरी ते उतरले होते. त्यांच्या घरीच बाबासाहेबांनी चहा पाणी घेतलं होतं,” अशी आठवण समतानगर इथल्या हिराबाई दुंदांजी सोनावणे (वय 95) या आजीबाईनं सांगितली.
बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झाली सतीची विहीर : बाबासाहेबांच्या पदस्पर्शनं पावन झालेली सतीची विहीर वाचवण्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून लढा देत असून, पडघा ग्रामपंचायतीला वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नाही. अनेक अधिकाऱ्यांच्या संगनमतानं या जागेत व्यवहार करण्यात आल्याची शंका आहे, असा गंभीर आरोप पडघा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद साने (वय 79) यांनी केला आहे. या संदर्भात पडघा भागात राहणारे कवी मिलिंद जाधव यांनी मुंबई, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, ठाणे जिल्हाधिकारी, भिवंडी प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडं लेखी निवेदन देऊन विहीर बुजवणाऱ्यांवर तातडीनं कारवाईची मागणी केली आहे. तसेच “डॉ. बाबासाहेबांनी पदस्पर्श केलेली ही विहीर आमच्या पडघ्याचा अभिमान आहे. ‘डॉ बाबासाहेबांच्या पाऊलखुणा पुसू देणार नाही,’ इतिहास पुसण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. विहीर पुन्हा उघडी करण्यासाठी माझा लढा कायम राहील,” असं मिलिंद जाधव यांनी बोलताना सांगितलं. आता शासन ही घटना गांभीर्यानं घेणार का? ही ऐतिहासिक विहीर पुन्हा उघडली जाणार का? की डॉ. बाबासाहेबांच्या पडघ्याशी निगडित असलेल्या अमूल्य पाऊलखुणा कायमच्या पुसल्या जाणार? या प्रश्नांकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर : या संदर्भात पडघा मंडळ अधिकारी संतोष आगविले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “या सतीच्या विहिरीबद्दल यापूर्वीही 2019 मध्ये चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता. तसेच दोन दिवसांपूर्वीच पुन्हा माझ्याकडं तक्रार अर्ज आला. त्या अर्जावर इथं मंगळवारी सुनावणी घेऊन पुढील चौकशी करून विहीरबाबत निर्णय दिला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. मात्र या ऐतिहासिक विहिरी संदर्भात प्रशासकीय यंत्रणा सुस्त असल्यानं येथील भूमाफिया मस्त असल्याचं दिसून येत आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं ही ऐतिहासिक विहीर बुजवली जात असल्याचा आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी करत आहेत.
Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.