ठाणे,दि. २० :– राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भिवंडी तालुक्यातील डोहळे, मुरबाड तालुक्यातील खेवारे व शहापूर तालुक्यातील भावसे -खोस्ते या ठिकाणी गावपातळीवर व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने रविवार दि, १८ रोजी आयोजन करण्यात आले होते.
या अभियानाच्या प्रचार व जनजागृतीसाठी अभिनेत्री शिवाली परब व अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी या गावांना भेट दिली.
यावेळी अभिनेत्री शिवाली परब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असून, प्रत्येक ग्रामस्थाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. स्पर्धात्मक स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या या अभियानात सहभागी होऊन गावाने बक्षिसे मिळवावीत, असे आवाहन त्यांनी केले.
अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले की, शासकीय विविध योजना गावातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचारी वर्ग योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून ग्रामस्थांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले गाव समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून समृद्ध गावनिर्मितीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
भावसे येथील कार्यक्रमात संत श्री रमण नाथजी महाराज, तानसा मठाचे मठाधीपती अलोकनाथजी महाराज, शहापूर चे आमदार दौलत दरोडा, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, गटविकास अधिकारी श्री राठोड, गट शिक्षण अधिकारी हिराजी वेखंडे, महिला बालविकास अधिकारी सौ, धनश्री साळुंखे,सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.