ठाणे :भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपा कार्यकर्ते आणि कोणार्क विकास आघाडीचे कार्यकर्ते आपसात भिडले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवाराच्या घरावर हल्ला केला. तर दुसऱ्या गटानं भाजपा आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड करत तुफान मारहाण केली. या मारहाणीत एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, सरकारी फिर्यादी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांच्या तक्रारीवरून विलास पाटील गटाच्या 100 ते 150 जणांवर तर भाजपाच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल केलेत.
कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी : “दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी विविध कलमांनुसार निजामपूर पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी पोलिसांनी विलास पाटील यांच्या बंगल्यात बसलेल्या 35 जणांना ताब्यात घेतलंय. तर, भाजपा आमदार महेश चौघुले गटातील 8 जणांना असे एकूण 44 जणांना अटक केलीय. या सर्वाना भिवंडी न्यायालयात हजर केलंय. यावेळी न्यायालायानं या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी सर्वांना पोलीस कोठडी सुनावली आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांनी दिली.
पोलिसांनी जमाव पांगवला : कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या पॅनलचा प्रभाग क्रमांक 1 मध्ये विजय झाला. तिथं भाजपा आमदार महेश चौघुले यांचा पुत्र मित याचा दारुण पराभव झाला. त्यानंतर कोंबडपाडा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. रविवारी रात्रीच्या सुमारास काहींनी माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर दगडफेक करत हल्ला केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट समोरासमोर भिडले. यावेळी त्यांनी दगडफेक केली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगवला.
परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद : या राड्यानंतर रात्रभर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आमदार महेश चौघुले गटाचे भावेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजी महापौर विलास पाटील यांच्यासह 100 ते 150 जणांविरोधात गुन्हा नोंदवलाय. तर विलास पाटील गटाचे हर्ष वरळीकर यांच्या तक्रारीवरून चैतन्य पुल्लेवार आणि इतर 15 ते 20 जणांविरोधात निवडणूक जिंकल्याचा राग मनात ठेवून रत्नदीप बंगला इथं हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवलाय. तसंच राजू तडका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजपा उमेदवार रितेश टावरे आणि त्यांच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांवर घरावर हल्ला करून ठार मारण्याच्या उद्देशानं गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केलाय.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी : भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी सोमवारी दुपारी गोकुळ नगर येथील विलास पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध केला. यावेळी त्यांनी निजामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली.