(विशेष बातमीदार ):अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्पमित्र म्हणून मोठी प्रसिद्धी मिळवलेला आकाश जाधव आता पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. सापांना जीवदान देण्याच्या आणि समाजसेवेच्या नावाखाली तो प्रत्यक्षात गांजा तस्करीचे मोठे रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले आहे. सोशल मीडियावर तब्बल ५६ लाख सबस्क्रायबर्स असलेल्या या कथित सर्पमित्राला छत्तीसगड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री त्याला अहिल्यानगरमध्ये आणण्यात आले. बुधवारी त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायमूर्तींनी त्याला २ मार्चपर्यंत म्हणजेच पुढील सहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्या या कृत्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात या अमली पदार्थ तस्करीप्रकरणी आकाश जाधववर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या सखोल तपासणीमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. झटपट आणि गडगंज पैसा कमावण्याच्या लालसेपोटी त्याने या काळ्या धंद्यात पाऊल ठेवले. तपासात असे निष्पन्न झाले आहे की, मूळचा मुळा नागरदेवळे येथील असलेला जाधव ओडिशा राज्यामधील उत्पादन केंद्रांमधून मोठ्या प्रमाणावर गांजाची खरेदी करत असे. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी त्याने चक्क रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) आणि मोठ्या मालवाहतूक ट्रकचा अत्यंत हुशारीने वापर केला. मध्य प्रदेश आणि नागपूर या मार्गांवरून हा अवैध माल अहिल्यानगरमध्ये आणला जायचा आणि त्यानंतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये त्याची विक्री केली जात होती.
याआधी २० जून २०२५ रोजी पोलिसांनी केडगाव बायपास परिसरात एक मोठी कारवाई करत छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान आकाश जाधवच्या १२ साथीदारांना गांजासह रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र, त्यावेळेस या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेला आकाश जाधव तेथून पसार होण्यात यशस्वी ठरला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेरीस छत्तीसगडमध्ये त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
या तस्करीच्या जाळ्यामध्ये पैशांची मोठी उलाढाल झाली असून, मालाच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन स्वरूपात आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या पैशांच्या देवाणघेवाणीच्या साखळीत सामील असलेल्या इतर आरोपींनाही पोलिसांनी अटक करून जाधवचे हे संपूर्ण नेटवर्क मुळासकट उद्ध्वस्त केले आहे. केवळ अहिल्यानगरच नाही, तर पुणे शहरातही त्याच्या विरोधात गांजा तस्करीशी संबंधित गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सर्पमित्राच्या नावाखाली चालणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांनी यापूर्वीच बारकाईने लक्ष केंद्रित केले होते. आता या टोळीतील इतर सहभागी आरोपी, त्यांचे आंतरराज्यीय धागेदोरे आणि यामागील सर्व आर्थिक व्यवहार उघडकीस आणण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवली जात आहेत. या सखोल चौकशीतून आगामी काळात आणखी काही मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.