
ठाणे : ५५ वर्षीय नराधम आजोबानं नातीच्या १५ वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बदलापूर पूर्वे भागातील एका हायप्रोफाईल सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी नराधम आजोबाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही गतिमंद आहे. ती कुटूबांसह बदलापूर पूर्वेतील एका हायप्रोफाईल सोसायटीत राहते. तर नराधम आजोबा हाही याच सोसायटीत राहत असून पीडित, अल्पवयीन गतिमंद मुलगी ही नराधम आजोबाच्या नातीची मैत्रीण आहे. त्याच ओळखीचा फायदा घेत, तसेच एकाच सोसायटीत राहत असल्यानं एकमेकांना ओळखत होते. याच ओळखीतून नराधम आजोबा हा पीडित मुलीच्या राहत्या घरात शिरला. त्यावेळी पीडित मुलगीही किचनमध्ये खिचडी शिजवत होती. त्यावेळी घरात कोणी नसल्याचं पाहून किचनमध्येच आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कोणाला या घटनेची माहिती दिली तर जीवे ठार मारण्याची नराधम आजोबानं पीडितेला धमकी दिली होती.
बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल- घटनेच्या दोन दिवसांपासून पीडित मुलगी गप्प राहिली. काहीतरी संशयास्पद घडल्याचं लक्षात येताच आईनं तिच्याकडे विचारणा केली. तेव्हा वडिलधारी वयाच्या व्यक्तीनं पीडितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाणे गाठून पीडितेवर झालेला प्रसंग कथन करताच पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचं गांभीर्य पाहता पोलिसांनी काही तासातच नराधम आजोबाला ताब्यात घेऊन अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयानं आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली आहे. सध्या, नराधम आजोबा हा न्यायालयीन कोठडीत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या प्रकरणात पोलिसांनी ११ नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला. तर आरोपीला १२ नोव्हेंबरला अटक केली आहे. चार दिवस पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपीची १९ नोव्हेंबरला २१ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

