ठाणे | मुरबाड :प्रतिनिधी.
मुरबाड–कल्याण राष्ट्रीय महामार्ग जवळ वांजळे परिसरातील सचिन लॉज येथे मध्यरात्रीच्या सुमारास थरारक जबरी दरोड्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. ५ जणांच्या टोळीने ग्राहक बनून लॉजमध्ये प्रवेश करत मालकीण व त्यांच्या मुलीला शस्त्रांचा धाक दाखवत बांधून ठेवले आणि सुमारे ४ लाख रुपयांचा ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे २ आरोपींना रंगेहात पकडण्यात यश आले. सचिन लॉजिंगच्या मालकीण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी कोयता व इतर धारदार शस्त्रांचा धाक दाखवत आठ सोन्याच्या बांगड्या, एक चैन, दोन अंगठ्या आणि तीन मोबाईल असा ऐवज हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपी मोटारसायकलवरून पळून जाण्याच्या तयारीत असताना नागरिकांनी तत्काळ पाठलाग सुरू केला.पोटगाव परिसरात २ आरोपींना पकडून संतप्त नागरिकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. उर्वरित तीन आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन विशेष पथके कार्यरत आहेत.या प्रकरणी मुरबाड पोलिस ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम 310(2), 311, 61(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून पाच सोन्याच्या बांगड्या, दोन अंगठ्या, तीन मोबाईल व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित तिघांच्या अटकेसाठी शोधमोहीम वेगात सुरू आहे.या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमळकर करत आहेत.