(किन्हवली/प्रतिनिधी:)रात्रीच्या सुमारास बंद घराच्या पाठीमागील खिडकीची लोखंडी ग्रील उघडून घरातील कपाटात असलेल्या सोन्याचे दागिन्यांसह रोख रकमेवर हात मारणाऱ्या सहा आरोपींच्या मुसक्या अखेर किन्हवली पोलिसांनी आवळल्या आहेत. घटनास्थळास जोडणाऱ्या रस्त्यांचे सी सी टी व्ही फुटेज यास डाटा प्राप्त करून तांत्रिक बाबींच्या सूक्ष्म विवेचनातून किन्हवली पोलिसांनी मोठ्या शिताफिने गुन्ह्याचा तपास करत तब्बल 17 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना गजाआड केले आहे.
शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात घरफोड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. किन्हवली पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरपाडा येथील सिताराम विठ्ठल उमवणे यांच्या राहत्या घरी दि. 14/10/2025 रोजी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींनी बंद घराचा फायदा उठवत रात्रीच्या सुमारास घरपोडी केली होती. घराच्या पाठीमागील खिडकीची लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटामधील लॉकर तोडून 13 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लंपास करून पोबारा केला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे स्तरावर पथक तयार करण्यात आले होते. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर यांनी गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती प्राप्त करून, तांत्रिक विश्लेषणाद्वारे व घटनास्थळाला जोडणाऱ्या रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा मागमुस काढत मुसक्या सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अधिक तपास केला असता आरोपींनी गुन्हा मान्य केला असून आरोपींकडून 14.31 लाखाचे सोन्याचे दागिने, 30 हजार रुपये रोख, व दुचाकी असा तब्बल 17.30 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यातील 6 आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे . दरम्यान ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी एस स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, शहापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नितीन खैरनार, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर, पो.हवा. महेश दळवी, पो.शि.सचिन चोरघे, पो.शि. जगदीश देसले आणि अन्य सहकार्यांनी तपास करून आरोपीना पकडले आहे.
आरोपी
जयेश बाळू जमदरे, नितेश लहू देसले (रा. गुंड्याचापाडा), सिद्धार्थ बाळकृष्ण केदार,( रा. नारायणगाव), समीर नजीर शेख,( सापगाव), अभय भगवान हरड, (खरीवली), विनय विष्णू लुटे,( अघई )