ठाणे, दि. २९ :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले असून, जिल्हा परिषद ठाणे यांनी राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या पार्श्वभूमीवर आज, दिनांक २८ मार्च, २०२६ रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट कार्यालयप्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश कुमार तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जिल्हा परिषद ठाणे यांना ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात तृतीय क्रमांक मिळणे हे संपूर्ण प्रशासनासाठी अभिमानास्पद आहे. डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख सेवा देण्याच्या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. या यशामध्ये सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे समन्वयपूर्ण योगदान महत्त्वाचे ठरले असून, विशेषतः उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी कामकाज अधिक प्रभावीपणे केले. जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांची ही फलनिष्पत्ती असून, भविष्यातही अधिक गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले.
सात निकषांवर उत्कृष्ट कामगिरी या मूल्यमापनात कार्यालयाची अधिकृत संकेतस्थळ व्यवस्था, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, AI व Blockchain तंत्रज्ञानाचा वापर तसेच GIS प्रणालीचा प्रभावी वापर या सात महत्त्वाच्या निकषांवर जिल्हा परिषद ठाणे यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. डिजिटल प्रशासनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल जिल्हा परिषद ठाणेच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाची साक्ष देणारे ठरले आहे.