(उल्हासनगर ):उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी कलानी समर्थकांनी शिवसेनेसोबत दोस्ती का गठबंधची घोषणा करत आपली स्वतंत्र युती जाहीर केली होती.यंदा शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले कलानींचे शिलेदार विजयी झाले.उल्हासनगर महापालिकेत तब्बल ९ वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीनंतर महापौर पदाची पहिली संधी टीम ओमी कलानी गटाला मिळाली.कलानी महलातील एक विश्वासार्ह आणि सुरेश उर्फ पप्पू कलानी तसेच ओमी कलानी यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे कमलेश निकम यांच्या पत्नी अश्विनी निकम यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडल्याने सत्तेचा पहिला मान कलानी गटाला मिळाल्याचे बोलले जात आहे.
सत्तेचा पहिला मान कलानी गटाला मिळाल्यानंतर त्याचा आनंद कलानी कुटुंबांकडून मोठ्या जल्लोषात व्यक्त करण्यात आला.कलानी गटाच्या अश्विनी निकम महापौर झाल्यानंतर संपूर्ण कलानी कुटुंबीय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयात हजर होते. यावेळी माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी, ओमी कलानी, माजी महापौर पंचम कलानी, नगरसेविका सीमा कलानी उपस्थित होत्या.कलानी कुटुंबीयांची ही उपस्थिती उल्हासनगर महानगरपालिकेत त्यांच्या वर्चस्वाची साक्ष देत होती.
उल्हासनगर महानगरपालिकेत गेल्यावेळी भाजपाच्या चिन्हावर रिंगणात उतरणारे माजी आमदार पप्पू कलानी यांनी यंदा शिवसेनेशी दोस्तीचं गठबंधन करत गड राखला आहे. विशेष म्हणजे कलानी गट शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणुकीत उतरला होता. उल्हासनगर महानगरपालिकेत गेल्या काही वर्षांपासून कलानी गटानं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. आधी काँग्रेस, मग राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि आता शिवसेना अशा सर्व पक्षांच्या माध्यमातून कलानींनी निवडणुकीत आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवलं आहे.