ठाणे – बारावीची परीक्षा देण्यासाठी जात असताना १८ वर्षीय सोहम कठरे या विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. मुंब्रा – कळवा रेल्वे स्थानकादरम्यान मुंबई सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या उपनगरी गाडीतून पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. मंगळवारपासुन बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असताना पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, लोकलच्या गर्दीनं विद्यार्थ्याचा बळी गेल्यानं मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
परीक्षेला जाताना झाला मृत्यू – सोहम हा डोंबिवली येथे आई – वडिलांसमवेत वास्तव्यास होता. तो कळव्यातील न्यू कळवा हायस्कूल येथे १२ वी सायन्समध्ये शिक्षण घेत होता. कळव्यातील मनिषा विद्यालय येथे त्याचं परीक्षा केंद्र होतं. मंगळवारी सकाळी परीक्षेसाठी सोहम डोंबिवली येथून लोकलनं निघाला होता. नेहमीप्रमाणंच लोकलमध्ये तुडुंब गर्दी होती. गर्दीनं ओसंडून वाहणाऱ्या मुंबई सीएसटी लोकलमध्ये दरवाज्यात लटकून जाताना मुंब्रा – कळवा स्थानकादरम्यान सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास तोल जाऊन सोहम खारेगाव फाटकाच्या आधी रेल्वे ट्रॅकवर पडला.
डॉक्टरांनी केलं मृत घोषित – स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेतील सोहमच्या अपघाताची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीनं नागरिकांच्या मदतीनं त्याला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं असता सकाळी १० : ३० वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
रेल्वे प्रशासनानं दखल घ्यावी – सोहमच्या मृत्युची बातमी कळताच सोहमच्या पालकांना धक्का बसला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची रेल्वे प्रशासनानं गांभीर्यानं दखल घ्यायला हवी, अशी मागणी सोहमच्या कुटुंबानं केली आहे. तसंच सोहमचं शाळा प्रशासन देखील रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या रेल्वे प्रवासावर उपाययोजना कराव्यात, असं पत्र देणार आहे.