ठाणे – आरटीई प्रक्रियेला ९ जानेवारीपासून सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी आणि पडताळणी पार पडली आहे. यासाठी ३० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातून ५३९ शाळांची पडताळणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षी ६०० हून अधिक शाळांचा आरटीई प्रक्रियेत सहभाग होता. परंतु, यंदा बहुतांश शाळांनी आरटीई प्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदा किती जागांसाठी ही आरटीई प्रक्रिया पार पडेल याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
शिक्षण हक्क कायदा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळावा यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात शाळा नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया पार पडली. शाळा नोंदणीसाठी सुरुवातीला १९ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू,शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे या प्रक्रियेसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार, ३० जानेवारी पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची होती. ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी ६०० हून अधिक शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. परंतू, यंदा शाळांचा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. यंदा आरटीई प्रक्रियेसाठी ६०१ शाळांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी केवळ ५३९ शाळांची पडताळणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
या वर्षाची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास खूपच विलंब झाल आहे. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .शाळा नोंदणी करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा शाळेचा प्रतिसाद कमी दिसत आहे.याचे मुख्य कारण म्हणजे आरटीई प्रतिपूर्ती शुल्क सरकारकडून वेळेवर शाळांना अदा केले जात नाही. काही शाळा या मायनॉरिटी मध्ये बदल करून आरटीई मधून बाहेर पडत आहे .सरकारचे आरटीई प्रवेश प्रकियेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे असे चित्र आहे. शिक्षण विभागाने शाळांच्या विरोधात कडक उपाययोजना करून लवकरात लवकर प्रवेश प्रकिया सुरू करून पालकांना दिलास द्यावा. – प्रकाश दिलपाक, शिक्षण आरोग्य अधिकार मंच