उल्हासनगर प्रतिनिधी :महापालिका मालमत्ता कर विभागाने थकीत मालमत्ता कर भरला नसल्याच्या कारणास्तव कॅम्प नं-२ येथील एका भूखंडाला नोटीस देऊन त्याचा अटकाव केला. पुढील कारवाईसाठी मालमत्ता कर विभाग व अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे मंगळवारी भूखंडावरील काही झोपड्यावर दबंगगिरी करीत पाडकाम कारवाई केली.
- उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर वसुली जास्तीतजास्त होण्यासाठी तीन टप्प्यात अभय योजना लागू केली. योजनेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल ४३ कोटीची वसुली झाली. तर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अभय योजनेकडे मालमत्ताधारकांनी पाठ फिराविल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मालमत्ता कर विभागाने कॅम्प नं-२, टेलिफोन एक्सचेंज जवळील एका भूखंडाचा लाखो रुपयाचा मालमत्ता कर थकीत असल्याच्या कारणास्तव भूखंड मालकाला नोटीस देऊन भूखंडाचा अटकाव केला. तसेच त्याठिकाणी महापालिकेने नामफलक लावला आहे. मंगळवारी मालमत्ता कर विभाग व अतिक्रमण विभागाने, संयुक्तपणे थकीत मालमत्ता कर वसुलीच्या पुढील प्रक्रियेसाठी भूखंडावर नव्याने उभ्या राहिलेल्या काही झोपडपट्टीवर पाडकाम कारवाई केली. तशी कबुली अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिली आहे.