
. हिच ती निर्दयी माता…
(शहापूर:28 जुलै):आई या शब्दाला कलंक लावणाऱ्या संध्या दिनकर (भेरे )या निर्दयी आईनेच आपल्या पोटच्या तीन मुलींना जेवणात तणनाशक हे औषध टाकून त्यांचा जीव घेतला आहे हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे,हा भयानक प्रकार अस्नोली येथे तिचे माहेर असलेल्या घरी घडला आहे.
संध्या हिचा विवाह चेरपोली शहापूर येथील संदीप भेरे याच्याशी झाला होता काही काळ त्यांच वैवाहिक जीवन सुरळीत होते त्यानंतर त्यांना तीन मुली झाल्या, मात्र दोघा पती पत्नी मध्ये पटत नसल्याने संध्या ही आपल्या तीन मुलींसोबत आठ महिन्यांपासून आपल्या माहेरी पतीपासून विभक्त रहात पडघा येथील वेअरहाऊस मध्ये कामाला जात होती,
21जुलै रोजी काव्या (10वर्ष) दिव्या (8)व गार्गी (5) यांना जेवल्यानंतर पोटदुखी व उलट्या सुरु झाल्या उपचारासाठी त्यांना अस्नोली येथील खाजगी डॉक्टर कडे नेण्यात आले, मात्र तिघींची प्रकृती खालावत असल्याने दोघींना मुंबईच्या नायर व एकीला घोटी येथील धामणगाव येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिघींचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पती संदीप याने पत्नीवर संशय घेत पोलिसात तक्रार दाखल केली, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी, एस, स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किन्हवली पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन खैरनार, महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरु केला व संध्या हिला ताब्यात घेतले, शव विच्छेदनाच्या अहवालनंतर स्पष्ट झाले कि तिन्ही मुलींना विषबाधा झाली आहे, त्यांनतर आई संध्या हिची कसून चौकशी केली असता तिने कबुली दिली कि मीच त्यांच्या जेवणात तणनाशक टाकले होते, मी माझ्या जीवनात त्रस्त होते तिन मुलींचे संगोपन करण्यास मी असमर्थ होते म्हणून कंटाळून असे कृत्य केल्याची कबुली तिने दिली.
घटनाक्रम लक्षात घेता संध्या (30) हिने जाणीवपूर्वक आपल्या तीनही मुलींच्या जेवणात तणनाशक औषध मिसळून ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने संध्या हिच्यावर किन्हवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. अधिकचा तपास सपोनी नितीन खैरनार करत आहेत.